'पारगड हेरिटेज रन’ मधून पर्यटन व पर्यावरण संवर्धनाचा जागर, मॅरेथॉन स्पर्धेत अडीच हजार धावपटूंचा सहभाग, आ. शिवाजीराव पाटील यांच्याकडून पुढील वर्षासाठी ११ लाख रुपयांची बक्षिसे - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2026

'पारगड हेरिटेज रन’ मधून पर्यटन व पर्यावरण संवर्धनाचा जागर, मॅरेथॉन स्पर्धेत अडीच हजार धावपटूंचा सहभाग, आ. शिवाजीराव पाटील यांच्याकडून पुढील वर्षासाठी ११ लाख रुपयांची बक्षिसे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     सह्याद्रीच्या डोंगररांगांत दिमाखाने उभ्या असलेल्या ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगडाच्या साक्षीने रविवारी इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे अडीच हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला.


        यावेळी बोलताना आम. पाटील यांनी सांगितले की, “पारगड हेरिटेज रन ही केवळ मॅरेथॉन नसून इतिहास, निसर्ग आणि पर्यटन यांना जोडणारी एक चळवळ आहे. शिवरायांचा वारसा, चंदगडची निसर्गसंपदा आणि ग्रामीण भागातील पर्यटन क्षमता देशासमोर मांडणारा हा एक प्रेरणादायी उपक्रम आहे.”

    दुर्गम डोंगराळ भागात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या आऊटप्ले स्पोर्ट्स टीमचे त्यांनी विशेष कौतुक केले. “एक धाव निसर्ग संवर्धनासाठी” हा संदेश आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.


       देशाच्या विविध भागांतून आलेल्या धावपटूंसह स्थानिक युवक-युवतींनीही अशा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. साहसी, ऐतिहासिक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणारे असे उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करतात, असेही त्यांनी नमूद केले. विविध १८ गटातील ५४ विजेत्यांना दिली जाणारी बक्षिसांची रक्कम १ लाख रुपये होती. ती वाढवून त्यांनी ३ लाख केली. 


   पुढील वर्षीच्या बक्षीसांसाठी ११ लाख ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपये देण्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली. याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. पारगडच्या ऐतिहासिक वारशाला आधुनिक पर्यटनाची जोड देणारा हा उपक्रम भविष्यात चंदगडच्या पर्यटन नकाशावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

       यावेळी स्टाफ इंडियाचे सीईओ बिपीन चिरमुरे, माजी आम. राजेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रकाश बेलावडे, दीपक पाटील, जि. प. सदस्या राजश्री गावडे, पं. स. सदस्या सुवर्णा कुंभार, तहसीलदार राजेश चव्हाण, तहसीलदार ऋषीकेश शेळके, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, नगराध्यक्ष सुनिल काणेकर, 


    उपनगराध्यक्ष आयेशा नायकवाडी, उद्योगपती लक्ष्मण गावडे, कान्होबा माळवे, अशोक पांडव, सुनिल मालुसरे, विशाल बल्लाळ, अभिजीत गुरबे, अमेय सबनीस, सरपंच तुकाराम सुतार, रघुवीर शेलार, नगरसेवक अबुझर मदार, नगरसेविका शीतल कट्टी, वनपाल दत्ता पाटील, मनोहर भवानजी भालेकर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, 

   ग्रामस्थ, आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबईचे सदस्य, महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील व देशाच्या विविध भागातून आलेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत पाटील यांनी केले. प्रवीण चिरमुरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment