
म्हशींच्या झुंजीचे संग्रहित छायाचित्र
चंदगड : सी एल वृत्तसेवा
दोन म्हशींची भीषण टक्कर लागून दोन्ही म्हशी लगतच्या पाण्याच्या चरित जाऊन पडल्याने दोन्हींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनाला चटका लावणारी ही घटना चंदगड तालुक्यातील कोवाड येथे घडली. या घटनेमुळे दोन्ही मालकांचे मिळून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रुपये नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी दि. १६/०७/२०२६ रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचा पंचनामा महसूल विभागा मार्फत करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कोवाड (ता. चंदगड) येथील लक्ष्मण दत्तू कांबळे यांचा मुलगा रोहन व नामदेव ओमाना आडाव हे आपल्या म्हशी स्वामीकार रणजित देसाई यांच्या वारी शेताच्या पुढे दुंडगे हद्दीत नुकत्याच बसवलेल्या सोलार सिस्टिमच्या जवळपासच्या भिम टेकडी परिसरात चरण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे दोन्ही कळपातील दोन म्हशींची टक्कर लागली. टक्कर एवढी भीषण होती की तेथील गुराख्यांना ही झुंज सोडवून घेणे शक्य झाले नाही. अशातच कांबळे यांच्या म्हशीचा पाय आडाव यांच्या म्हशीच्या शिंगात अडकल्याने झुंज लागलेल्या अवस्थेतच दोन्ही म्हशी येथील छोट्या पाझर तलावाच्या बाजूस चरीत जाऊन पडल्या. चरीत पाणी कमी असले तरी शिंगात पाय अडकलेल्या अवस्थेत असल्याने दोन्ही म्हशींची डोकी खाली गेली. नाका तोंडात पाणी गेल्याने दोन्ही म्हशींचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही मालकांचे सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आडाव यांनी सदर म्हैस १५ दिवसांपूर्वीच सुमारे सव्वा लाख रुपये किमतीला आणल्याचे समजते. घटनेनंतर पोलीस पाटील परशराम बाळेकुंद्री, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर ए. बी. माने, महसूल अधिकारी प्रशांत पाटील व पंचांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबत परिसरातील शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून गोकुळ दूध संघ शासनाकडून दोन्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment