चंदगड : सी एल वृत्तसेवा
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे एका घरात विषारी नागाने शिरकाव केल्याने घरातील मंडळींची एकच तारांबळ उडाली. राजू पुंडलिक निवगिरे यांच्या घराच्या परिसरात हा साप दिसून आला.
रात्रीची वेळ असल्याने घरातील व शेजारी मंडळींची भीतीने गाळण उडाली. मात्र प्रसंगावधान राखून निवगिरे यांनी तत्काळ ढोलगरवाडी येथील सर्पमित्र संदीप टक्केकर यांना फोनवरून याबाबत कळवताच सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी विना विलंब घटनास्थळी धाव घेतली.
आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून त्यांनी अतिशय सुरक्षितपणे या विषारी नागाला पकडले. रात्रीच्या वेळी घरात शिरलेल्या सापाने दंश केला असता तर अनर्थ घडला असता. मात्र या विषारी सापाला वेळीच पकडल्यामुळे घरातील व शेजारी मंडळींचा जीव भांड्यात पडला.
सापाला कोणतीही इजा न होऊ देता त्याला पकडून सर्पमित्र टक्केकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यावेळी सर्पमित्र संदीप टक्केकर यांचे सर्वांनी आभार मानले. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment