चंदगड–जांबरे रस्त्याच्या डागडुजीला अखेर सुरुवात; लक्ष्मण गावडे व राजश्री गावडे यांच्या पाठपुराव्याला यश - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2026

चंदगड–जांबरे रस्त्याच्या डागडुजीला अखेर सुरुवात; लक्ष्मण गावडे व राजश्री गावडे यांच्या पाठपुराव्याला यश

 

चंदगड / प्रतिनिधी : 

    तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चंदगड–जांबरे मार्गाच्या डागडुजीच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

    या रस्त्यावरील खड्डे बुजविणे व डागडुजीचे काम संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे आणि अडकूर मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने कामाला मंजुरी देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

चंदगड–जांबरे मार्ग हा अनेक गावांना जोडणारा प्रमुख संपर्क रस्ता असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. डागडुजीचे काम सुरू झाल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, मतदारसंघातील रस्ते विकासासह विविध लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सौ. राजश्री गावडे आणि लक्ष्मण गावडे यांच्या कार्याचे जांबरे परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालक आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment