कागणी येथील कवी प्रा. बी. जी. खाडे यांच्या 'काय सांगू लेका तुला' कवितेला सर्वोत्कृष्ट काव्यरचनेचा मान - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2026

कागणी येथील कवी प्रा. बी. जी. खाडे यांच्या 'काय सांगू लेका तुला' कवितेला सर्वोत्कृष्ट काव्यरचनेचा मान

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

   पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य मुंबई विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. बी. जी. खाडे (मुळगाव कागणी, ता. चंदगड) यांच्या 'काय सांगू लेका तुला' या कवितेची सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवड करण्यात आली आहे. साहित्य संवेदना प्रस्तुत 'कवितेचे पान’ या साहित्यिक  उपक्रमांतर्गत शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी सादर झालेल्या सर्व काव्यरचनांमधून कवी खाडे यांच्या वरील कवितेची सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे. संस्थेने याबद्दल त्यांचा सन्मान करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या.

   या शिवाय प्रा. डॉ. खाडे यांची शब्दांच्या पलीकडे या काव्य संमेलनासाठी निवड करण्यात आली असून बी एस एफ बहुद्देशीय संस्था व संत कबीर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील 'आजींचं पुस्तकांचं हॉटेल' येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनात त्यांना 'शब्द प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

   रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या  या संमेलनात महाराष्ट्र राज्यातील निवडक कवी आपल्या कविता सादर करणार असून यातील उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या प्रथम तीन कवींना रोख ौौबक्षीस सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शब्दांच्या पलीकडे जाऊन कवितेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग, शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी विषयांवर समाज प्रबोधन करणाऱ्या कवितांना प्राधान्य दिले जाणार आहे. कविता ही केवळ कविता न राहता त्या माध्यमातून व्यवस्थेत बदल घडावा. अशी अपेक्षा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी व्यक्त केली आहे. शब्दांच्या पलीकडे या काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्ध साहित्यिका कु. अश्विनी सांगळे, वैशाली मा. सोनवणे, वैशाली सूर्यवंशी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment