चंदगड (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ऐतिहासिक किल्ले पारगड येथे आयोजित करण्यात आलेला भव्य शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपस्थित राहून शिवछत्रपतींना अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान शिवकालीन युद्धकौशल्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. तलवारबाजी, दांडपट्टा, भाला आणि इतर पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सादरीकरणातून शिवकालीन शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जिवंत करण्यात आला.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पारगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. पारगड हा स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा असून त्याचे जतन आणि संवर्धन होणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास भरमुआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, सौ. संज्योती मळवीकर, लक्ष्मण गावडे, ॲड. संतोष मळवीकर, कान्होबा माळवे, विद्याधर बाणे, रघुवीर शेलार, पारगड हेरिटेज रन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शेकडो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर संपन्न झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याने शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून शिवरायांच्या विचारांचा जागर अधिक व्यापक करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.




No comments:
Post a Comment