चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पहिले बाल कीर्तनकार म्हणून ओळख निर्माण केलेले इयत्ता ८ वी तील विद्यार्थी ह.भ.प. कुमार ओम महाराज युगंधरा बापूसाहेब शिरगावकर यांना युनिव्हर्सल युनिट फाउंडेशन, ठाणे यांच्याकडून ‘सर्वोत्तम व्यक्तिमत्व सन्मान पुरस्कार २०२६’ अंतर्गत बाल कीर्तनकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार लवकरच ठाणे येथे आयोजित विशेष समारंभात सुप्रसिद्ध फिल्म अभिनेते व विनोदी कलाकार दिलीप केदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अतिशय लहान वयापासूनच कु. ओम महाराज हे आपल्या वडिलांसोबत भजन, प्रवचन आणि कीर्तन कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याने त्यांना अध्यात्माची गोडी लागली. इयत्ता पाचवीपासून ते वारकरी शिक्षण संस्था, तुरंबे येथे ह.भ.प. ओमकार महाराज सूर्यवंशी यांच्याकडे वारकरी शिक्षण घेत आहेत.
आपल्या अभ्यासाबरोबरच अध्यात्माची साधना करत त्यांनी चंदगड तालुक्यातील पहिले बाल कीर्तनकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ओजस्वी आणि प्रभावी वाणीतून सादर होणारे कीर्तन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावी कोरज येथे प्रथम कीर्तन सेवा सादर केली होती. या कीर्तनाला हजारो हरिभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या कीर्तनांचे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत.
कु. ओम महाराज यांच्या अल्पवयातील उल्लेखनीय कार्याचा, अध्यात्मावरील निष्ठेचा आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा विचार करून निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे सांगितले. आजच्या आधुनिक काळात अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या बाल कीर्तनकाराचा आदर्श समाजासमोर ठेवण्याच्या उद्देशाने हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे समितीने नमूद केले.
भगवंत भक्ती आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून समाजातील तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कु. ओम महाराज शिरगावकर यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण हरिभक्त परिवार आणि चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment