
जेलुगडे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरुन अशा पद्धतीने पाणी वाहत आहे.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
आज बुधवार २२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता चंदगड तालुक्यातील पाटणे-जेलुगडे नजीकचे लघुपाटबंधारे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. हे पाणी पुढे ताम्रपर्णी नदीपात्रात जाऊन मिळते. त्यामूळे स्थानिक ओढाकाठ पर्यायाने ताम्रपर्णी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून पाटबंधारे विभाग दक्षिण कोल्हापूर कार्यालयाच्या वतीने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने पर्यटकांना येणेस बंदी आहे.
चंदगड तालुक्यातील मुख्य धरणांपैकी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी व ताम्रपर्णी नदीवरील झांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरले आहेत. याशिवाय तिसरे महत्त्वाचे धरण जंगमहट्टी हे आज दि. २२ रोजी सकाळी सात वाजता ७६.३० टक्के भरले असून १००% भरण्याकडे संथगतीने वाटचाल सुरू आहे. गेल्या चारपाच दिवसात तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी असून चंदगड दाटे परिसरात मध्यम तर पूर्वेकडील कोवाड कुदनूर राजगोळी भागात तुरळक पावसाच्या सरी येत आहेत. हा पाऊस पिकांना पोषक ठरत आहे. चंदगड तालुक्यातील शेतकरी वर्ग भात रोप लावणीच्या घाईगडबडीत असून शेतकऱ्यांनी बहुतांश रोप लावणी पूर्ण केली आहे.
दरम्यान पूर्व भागातील शेतकऱ्यांना अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्याच्या अति पूर्व भागातील (कर्नाटक सीमेला लागून असलेले) किटवाड नजीकचे दोन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प ९०% पेक्षा अधिक भरले आहेत. कालकुंद्री हद्दीतील किटवाड नंबर १ धरणाच्या सांडव्यातून तयार होणारा धबधबा प्रकल्प अजून पूर्ण न भरल्यामुळे कोरडा आहे. तरीही या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. पाणलोट क्षेत्रात एक दिवसही मोठा पाऊस पडला तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू शकतो.
No comments:
Post a Comment