कुदनूर येथील बंद 'आर.ओ. प्लांट' प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या हालचाली - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2026

कुदनूर येथील बंद 'आर.ओ. प्लांट' प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या हालचाली

  

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील जिल्हा परिषदेंतर्गत सुरू करण्यात आलेला शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प (आर.ओ. प्लांट) सध्या बंद अवस्थेत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर समस्येबाबत 'आपले सरकार' पोर्टलवर तक्रार दाखल झाली होती. याची दखल घेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यवाही अधिकाऱ्यांना यावर विहित मुदतीत तात्काळ कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती कुदनूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिली.

   कुदनूर येथे सन २०१८-१९ मध्ये जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या नावीन्यपूर्ण योजनेतून (अनुसूचित जाती उपयोजना - विशेष घटक योजना) जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जलशुद्धीकरण संयंत्र (UV+UF System) बसविण्यात आले होते. यासाठी सुमारे ३,२३,७५०/- रुपयांची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली होती. मे. एंजल इंजिनिअर्स, पुणे यांच्यामार्फत हे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र हा लाखो रुपयांचा प्रकल्प सध्या बंद असल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशांत कांबळे यांनी या बंद प्रकल्पाबाबत आणि प्रशासनाच्या दुर्लक्षतेबाबत 'आपले सरकार' पोर्टलवर अधिकृत तक्रार नोंदवली होती. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा त्यांनी या तक्रारीत लावून धरला आहे. हा विषय थेट ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी आणि हक्काच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे. प्रशासकीय दिरंगाईवर प्रकाश टाकणारी चंदगड तालुक्यातील ही महत्त्वाची घडामोड ठरली.

      यानंतर खडबडून जागे झालेल्या कुदनूर ग्रामपंचायत प्रशासनाने हालचाली गतिमान करत आंबेडकर नगर येथील 'आर.ओ. प्लांट' जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याची गुणवत्ता तपासली. ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले. गडहिंग्लज येथील प्रयोगशाळेतून लेखी अहवाल आल्यानंतर, हा प्रकल्प सर्वांसाठी खुला होईल. 'लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.' असे सोनार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment