
रिसॉर्ट भूमिपूजन प्रसंगी उपस्थित माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांचे स्वागत करताना विनायक पाटील व उपस्थित मान्यवर.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील मोटनवाडी ते ऐतिहासिक किल्ले पारगड मार्गावर गुडवळे हद्दीत पाच कोटी खर्चाचे रिसॉर्ट बांधण्यात येणार आहे. कडलगे बुद्रुक येथील तरुण उद्योजक विनायक रामचंद्र पाटील यांच्या कल्पनेतून साकारणाऱ्या या रिसॉर्ट, सीएनजी पेट्रोल पंप, रेस्टॉरंट व हॉटेल बांधकामचा भूमिपूजन समारंभ नुकताच माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. पश्चिम भागातील मुसळधार पावसात हा कार्यक्रम सोमवार दि. २० जुलै २०२६ रोजी पार पडला. यावेळी उद्योजक विनायक पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख रा. ज. पाटील, गुडवळे ग्रामपंचायत सरपंच व मान्यवर उपस्थित होते.
पारगड मोर्ले घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या मार्गावर बेळगाव, निपाणी, संकेश्वर, गोकाक व चंदगड भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. याशिवाय तिलारी प्रकल्प, पारगड इतिहासिक किल्ला, अंबोली या पर्यटन पट्ट्यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. या मार्गाच्या मध्यावर होणाऱ्या या सीएनजी पेट्रोल पंप, रिसॉर्ट, हॉटेलमुळे वाहनधारक व प्रवासी व पर्यटकांची सोय होणार आहे.
यावेळी बोलताना विनायक पाटील म्हणाले तिलारी, पारगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना माफक दरात सेवा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असेल. या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांची सीएनजी अभावी गैरसोय होत आहे. ती सीएनजी पेट्रोल पंप मुळे दूर होणार आहे. नियोजित रिसॉर्टवर लहान मुलांना वॉटर फॉल, स्नो फॉल व विविध खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पर्यटकांना राहण्याची जेवणाची व नाश्त्याची सोय या सुविधा उपलब्ध असतील. शिवाय या उपक्रमातून मिळालेल्या नफ्यातील दहा टक्के रक्कम ही अंध, अपंग, निराधार व धर्मादाय संस्थांसाठी देणार असल्याचे तसेच हा उपक्रम येत्या एक ते दोन वर्षात पूर्ण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment