चंदगड / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी तसेच शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने बँक ऑफ इंडिया, शाखा चंदगड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत केंद्रीय प्राथमिक शाळा, नांदवडे येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया, चंदगड शाखेचे शाखा व्यवस्थापक सुनील कुमार, रामप्रकाश, युवराज मलतवाडकर तसेच प्रा. डॉ. शाहू गावडे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर पाटील, महेश जांबोटकर, सागर मोरे, दत्तात्रय गणाचारी व संदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. शाहू गावडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या माध्यमातून जीवनात यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर मोरे यांनी केले. त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखा चंदगडच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शेवटी महेश जांबोटकर यांनी उपस्थित मान्यवर, बँक अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक व शिक्षकांनी स्वागत केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


No comments:
Post a Comment