मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवरील सवलती लागू; आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांचा पाठपुरावा - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2026

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवरील सवलती लागू; आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांचा पाठपुरावा

चंदगड / प्रतिनिधी

    मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सवलती व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांचे मराठा सेवकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

    मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजाला ओबीसी धर्तीवरील विविध शैक्षणिक योजना लागू करण्याची घोषणा झाली होती. मात्र अनेक अपग्रेडेड अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर शिक्षणामध्ये मराठा विद्यार्थ्यांना या सवलतींचा लाभ मिळत नव्हता. या संदर्भात मराठा सेवक समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याच अनुषंगाने आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंधित प्रतिनिधींची भेट घडवून आणून प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

    राज्य शासनाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमांसह नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १५५४ वाढीव अभ्यासक्रमांमध्येही सवलती लागू होणार आहेत. तसेच शालेय शिक्षण, सीएपी (CAP) राऊंडनंतर होणारे स्पॉट अॅडमिशन यासह विविध प्रवेश प्रक्रियांमध्येही विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

    गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या सवलती पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मराठा समाजावरील शैक्षणिक अन्याय दूर करून ही सवलत लागू व्हावी यासाठी आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांच्यासह मराठा सेवक समितीचे प्रमोद आरसूळ, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अवधूत सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, मराठा बिझनेस असोसिएशनचे संदीप पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चातील अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती मराठा सेवकांच्या वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment