चंदगड / सी एल वृत्तसेवा
मजरे कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन, ग्रामस्थ पारगड व गडहिंग्लज येथील शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने ऐतिहासिक किल्ले पारगड येथे दि. ५ व ६ जून २०२६ रोजी भव्य “शिवराज्याभिषेक सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर दोन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सीमाभाग, कोल्हापूर जिल्हा, कोकण येथील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देत तरुण पिढीमध्ये स्वराज्य, राष्ट्रप्रेम आणि इतिहासाची प्रेरणा जागविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. दि. ५ जून रोजी दुपारी गड स्वच्छता मोहिमेने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर गडपूजन पार पडणार आहे. सायंकाळी अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री शाहीर पराग निट्टूरकर व सहकारी यांचा दमदार शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम रंगणार आहे. त्यानंतर हलगी सम्राट संजय आवळे व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक गड जागरण व गोंधळ कार्यक्रम होणार आहे.
दि. ६ जून रोजी पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होणार असून ध्वजारोहण, झुंजार मर्दानी खेळ, ढोल ताशाचा गजर, शिवकालीन युद्धकलेवरील मार्गदर्शन तसेच ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये इतिहास अभ्यासक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी ठीक साडे सात वाजता मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असून पारंपरिक ढोल-ताशे, भगवे ध्वज आणि शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. शिवरायांच्या पराक्रमाची आणि शंभूराजांच्या बलिदानाची आठवण जागविणारा हा सोहळा शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. तरी या शिवराज्याभिषेक सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment