किल्ले पारगड वर शिवराज्याभिषेक दिनी पाण्याचा ठणठणाट, नळ पाणीपुरवठा विभागाच्या ढिम्म कारभारामुळे पर्यटक, शिवप्रेमीं मध्ये संताप - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2026

किल्ले पारगड वर शिवराज्याभिषेक दिनी पाण्याचा ठणठणाट, नळ पाणीपुरवठा विभागाच्या ढिम्म कारभारामुळे पर्यटक, शिवप्रेमीं मध्ये संताप

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वर गेली ६-७ वर्षे पाण्याचा ठणठणाट आहे. गडावरील सर्व तलाव व विहिरी मार्च महिन्यातच कोरड्या ठाक पडल्या आहेत. तथापि यावर उपाय योजना न करता कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती चंदगडचा नळ पाणीपुरवठा विभाग चाल ढकल व उडवा उडवीची उत्तरे देण्यातच व्यस्त आहे. यामुळे गडावर येणारे पर्यटक शिवप्रेमी व ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

    पारगड वरील ग्रामस्थांसाठी व येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन पाच वर्षे झाली. योजनेच्या पूर्ततेसाठी येथील ग्रामस्थांनी तीन वेळा चंदगड पंचायत समिती समोर आमरण उपोषणे केली. तथापि प्रत्येक वेळी केवळ सरबत देऊन वेळ मारून नेण्यातच नळ पाणीपुरवठा विभाग धन्यता मानताना दिसत आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे गडावरील शिवकालीन तलाव विहिरी मार्च महिन्यामध्येच कोरड्या पडत आहेत. त्यानंतर पावसाळा सुरू होईपर्यंत काय करायचे? हा प्रश्न ग्रामस्थांसह सर्वांना भेडसावत आहे. अनेक गावातील योजना वर्षभरात पूर्ण झाल्या असताना पारगडचा पाणी प्रश्न अधांतरीच राहिला आहे. अजूनही नळपणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचे स्रोत शोधण्याचेच काम सुरू आहे. काही महिन्यापूर्वी पारगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले असले तरी त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सोयी सुविधांचा दूर दूर पर्यंत काही मागमूस दिसत नाही.

   मागील काही वर्षांपासून गडावर शहीद जवान वेल्फेअर असोसिएशन कार्वे, पारगड ग्रामस्थ व चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव सह कोकण व गोवा भागातील शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमाच्या धरतीवर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. शासनाचे पाच पैसे न घेता या कार्यक्रमासाठी येणारा खर्च वेल्फेअर असोसिएशन व शिवप्रेमींच्या देणगीतून केला जातो. यावेळी हजारो शिवभक्त दोन दिवस गडावर मुक्कामी असतात. त्याचबरोबर दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. यावेळी देशभरातील हजारो धावपटू गडावर दोन दिवस उपस्थित असतात. 

  मागील वर्षी (२०२५) च्या मे महिनाअखेरीस मान्सूनपूर्व पावसामुळे गडावरील तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी साठले होते. तथापि यावर्षी पाऊस नसल्यामुळे दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. 

   या पाणी बाणी वर मात करण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचायत समिती चंदगड नळ पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टँकरद्वारे चार दिवस घरोघरी व कार्यक्रमाच्या ठिकाणासह गडावरील घरोघरी पुरेसा पाणीपुरवठा करावा. कारण येणारे सर्व शिवभक्त व धावपटू गावातील घरांमध्ये वास्तव्यास असतात. तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी राज्याभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्तेजना द्यावी. अशी मागणी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार चंदगड यांच्याकडे केली आहे. यामुळे पंचायत समिती नळ पाणीपुरवठा विभाग कोणती पावले उचलते, याकडे शिवप्रेमी, खेळाडू व पर्यटकांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment