चंदगड : माडखोलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2026

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुयश

 


चंदगड: प्रतिनिधी

    येथील र. भा.  माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत  शिवाजी विद्यापीठाचा कार्यक्रम व्यवस्थापन अभ्यासक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट)    प्रतिवर्षी राबविण्यात येतो. प्रत्येक वर्षी या विभागातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलेले आहे. यंदाही या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 29 विद्यार्थ्यांनी विशेषश्रेणी संपादन केली तर तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

          सध्याच्या धकाधकीच्या काळात एखाद्या कार्यक्रमाचे नेटके संयोजन करण्यासाठी अशा प्रकारचे व्यावसायिक कौशल्य असलेल्या व्यक्तींची गरज भासत असते. या कार्यक्रमातून संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा,त्याचे नेटके नियोजन, प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्यामुळे अनेकांना आपला कार्यक्रम कोणत्याही ताणतणावा शिवाय यशस्वीपणे राबविता येतो. बदलल्या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम वाढल्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे अशा प्रमाणित व्यावसायिक अभ्यासक्रमाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे अभ्यासक्रमाचे समन्वयक व प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल आणि सर्व प्राध्यापक,  कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. परिसरातूनही विद्यार्थ्यांचे  सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment