चंदगड : प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या झांबरे ग्रामपंचायतीचे विभागीय स्तरावरील मूल्यमापन नुकतेच पार पडले. अप्पर विभागीय आयुक्त (विकास) कार्यालय, पुणे यांच्या पथकाने ३ जुलै २०२६ रोजी गावाला भेट देऊन स्वच्छता व विविध विकासकामांची सविस्तर पाहणी केली.
यापूर्वी जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीनेही गावाची पाहणी केली होती. विभागीय समितीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक शौचालयांचा वापर, प्लास्टिकमुक्त उपक्रम, फटाकेमुक्त गाव, डीजे बंदी, शोषखड्डे, वृक्षसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, ग्रामसौंदर्यीकरण, शाळा व अंगणवाडी परिसरातील स्वच्छता, तंटामुक्त गाव तसेच ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामपंचायतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम यांची कसून तपासणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. पाहणीनंतर समितीने स्वच्छता व्यवस्थेचे कौतुक करत काही आवश्यक सूचना दिल्या. भविष्यातही स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन अप्पर आयुक्त (विकास) श्रीमती प्रांजल शिंदे यांनी केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता पुणे विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर स्थान मिळवण्याचा ग्रामपंचायतीचा निर्धार असल्याचे सरपंच विष्णू गावडे यांनी सांगितले. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक गाव घडविण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पाहणी समितीत श्रीमती प्रांजल शिंदे (अप्पर आयुक्त, विकास), रविंद्र कणसे (सहाय्यक आयुक्त), विशाल बुरकुंडे, अविनाश लोखंडे आणि कामत यांचा समावेश होता.
या यशामागे गटविकास अधिकारी श्रीमती वृक्षाली यादव, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष लक्ष्मण गावडे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे, विस्तार अधिकारी सुरेश ठोंबरे, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, महिला बचत गट, तरुण मंडळे आणि ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले. तसेच रणजीत पाटील, विशाल दुंडगेकर, राजेंद्र सांगावे, मुरलीधर कुंभार, सचिन गुरव, अवी बोलनावर, महादेव साहेब, नीता कबीर आणि दीपक गावडे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिल्याचे सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment