चंदगड : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी येथील रहिवाशी सावंतवाडी एसटी आगाराचे चालक मोतीराम कांबळे यांच्या घराच्या अंगणात आलेल्या जहाल विषारी नागाला सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून जीवनदान दिले. यामुळे कांबळे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. २३/१०/२०२६ सायं. ७:३० वाजता कांबळे यांच्या क्लासेस ला जाणाऱ्या मुलींना अंगणातील दगडांच्या फटीमध्ये एक मोठा साप हालचाल करताना दिसला. 'फोर्स जिम'चे ट्रेनर संजय पाटील यांना हे समजताच त्वरित सर्पमित्र संदीप टक्केकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घटनास्थळी पाचारण केले. सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगडांत लपलेल्या नागाला सुखरूप बाहेर काढून सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना संदीप टक्केकर यांनी "सध्या वाढत्या नागरीकीकरणामुळे साप आणि वन्यजीवांचे निवारे कमी होत चालले आहेत. परिणामी साप तसेच अन्य जंगली प्राणी मनुष्यवस्तीत येत असून अशा घटना वारंवार घडत असून त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. निसर्गातील अन्नसाखळीचा समतोल राखण्यासाठी सापांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असून, निसर्गात जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे.
साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून उंदरांचा बंदोबस्त करून तो पिकांचे रक्षण करतो. साप कधीही जाणूनबुजून किंवा स्वतःहून माणसावर हल्ला करत नाही, केवळ स्वसंरक्षणासाठी किंवा पाय पडल्यास अपघात म्हणून चावतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सापांबद्दल समाजात अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत आणि सापांचे संवर्धन व्हावे, यासाठी १९६६ पासून आद्यसर्पमित्र, संस्थापक सत्यशोधक स्वर्गीय बाबुराव टक्केकर सर यांनी हे अविरत कार्य सुरू केले होते. त्यांच्याच प्रेरणेने आणि शिकवणीतून आजही आम्ही हे समाजोपयोगी व निसर्ग संवर्धनाचे कार्य पुढे चालू ठेवत आहोत." यावेळी सर्पमित्र संदीप टक्केकर व त्यांना घटनेची माहिती देणारे संजय पाटील यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment