शिवचातुर्य दिनानिमित्त गरुड झेप मोहिमेंतर्गत गोव्यातील ५० महिला कलाकार आग्रा येथे 'शिवशौर्य' कार्यक्रम सादर करणार, १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र व गोव्यातील किल्ल्यांवरील जलाने शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2026

शिवचातुर्य दिनानिमित्त गरुड झेप मोहिमेंतर्गत गोव्यातील ५० महिला कलाकार आग्रा येथे 'शिवशौर्य' कार्यक्रम सादर करणार, १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र व गोव्यातील किल्ल्यांवरील जलाने शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक

 

'गरुड झेप मोहीम' गोवा प्रांताचे अध्यक्ष राजाराम शिवाजी पाटील यांच्यासोबत आग्रा येथे शिव शौर्य गाथा सादर करणारे ओमीड डान्स अँड फिटनेस संस्थेचे ताळगाव-पणजी गोवा येथील सदस्य

पणजी : सी एल वृत्तसेवा 
  १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अजोड बुध्दी चातुर्याच्या जोरावर औरंगजेबाच्या नजरकैदेतून सहीसलामत सुटका करून घेतली होती. इतिहासप्रसिद्ध आग्रा भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुरक्षिततेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सरसेनापती नरवीर पिलाजी गोळे यांच्यावर होती. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून, सरसेनापती पिलाजी गोळे यांचे १३ वे वंशज ॲड. मारुती उर्फ आबा गोळे यांच्या पुढाकाराने गेली ७ वर्षे 'आग्रा ते राजगड पायी प्रवास दौड मोहीम' (गरुडझेप मोहीम) आयोजित केली जात आहे. या मोहिमेत देशभरातील विविध प्रांतांतून अनेक तरुण शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

साखळी येथील किल्ल्यावरील विहिरीचे पवित्र जल आणण्यासाठी गेलेले राजाराम पाटील व त्यांचे सहकारी

 

गोमंतकीय शिवप्रेमींचा लक्षणीय सहभाग दिसून आला आहे यंदाही येथील शिवभक्त १३ ऑगस्ट २०२६ रोजी गोवा एक्सप्रेसने आग्रा येथील कार्यक्रमासाठी प्रयाण करणार आहेत.
  गोवा प्रांतातून गेली ५ वर्षे शिवश्री राजाराम शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोमंतकीय शिवप्रेमी या मोहिमेत सातत्याने सहभागी होत आहेत. १७ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आग्रा येथे अत्यंत शानदार सोहळ्यात विविध उपक्रमांनी "शिवचातुर्य दिन" साजरा केला जातो. या सोहळ्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, मंडळे आणि शालेय विद्यार्थी ऐतिहासिक-सांस्कृतिक कला सादर करून शिवरायांच्या या सुवर्णमयी इतिहासाला उजाळा देतात.
   गेतवर्षी सांकवाळ आणि कुठ्ठाळी येथील १०० महिला कलाकारांनी आग्रा येथे "शिवगाथा" हा ऐतिहासिक कार्यक्रम सादर करून जागतिक पातळीवर नवा विक्रम नोंदवला होता. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी, या वर्षी 'ओमीड डान्स आणि फिटनेस, ताळगाव-पणजी' येथील सौ. अंजू देसाई- राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ५० महिलांचा गट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारित विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण आग्रा येथे करणार आहे. याकामी हवाई दलातील माजी तांत्रिक कर्मचारी पद्माकर वाळूंज आणि मराठी नाट्य संस्कृतीचे दिग्दर्शक अमित दळवी यांचे सहकार्य लाभले आहे.
   या ऐतिहासिक सांस्कृतिक सादरीकरणासाठी 'चलो पणजी ते आग्रा' ही मोहीम सज्ज झाली आहे. गरुडझेप मोहिमेचे गोवा प्रमुख श्री. राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील हे पथक आग्रासाठी प्रस्थान करणार आहे.
'आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम' केवळ शिवरायांच्या शौर्याची आठवण देशवासीयांना करून देण्यापुरती मर्यादित नसून, या माध्यमातून "व्यसनमुक्त भारत" आणि "झाडे लावा, झाडे वाचवा" हा अत्यंत महत्त्वाचा आणि पर्यावरणपूरक सामाजिक संदेशही देशभरात पोहोचवला जाणार आहे. या मोहिमेबद्दल संपूर्ण गोव्यातून आणि शिवप्रेमींमधून कौतुक व सदिच्छांचा वर्षाव होत आहे.
  या मोहिमेंतर्गत चंदगड व बेळगाव तालुक्यातील पत्रकार बांधव सहभागी होणार असून त्यांच्या मार्फत चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील पारगड गंधर्वगड महिपाळगड कलानिधी गड सामानगड राजहंस गड या सहा किल्ल्यांसह कोकणातील वाळवंटी नदीच्या काठावर साखळी येथे सतराव्या शतकात येथील खेम सावंत भोसले यांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या किल्ल्यावरील विहिरीचे जल आग्रा येथे नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment