![]() |
| कोवाड मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही अशी गर्दी होती. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पुणे शिक्षक विधान परिषद व पुणे पदवीधर विधान परिषद या दोंन्हीसाठी चंदगड तालुक्यात आज मतदान शांततेत झाले. पुणे शिक्षक विधान परिषदेसाठी ५ मतदान केंद्रावर चंदगड तालुक्यातून सरासरी ९०.४१ टक्के मतदान झाले. एकूण ६९५ पैकी ५४७ शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रावर एकूण ३७७१ मतदारांपैकी २४३५ मतदारांनी म्हणजे ६४.५७ ट्कके मतदान झाले. मतदान सर्वत्र शांततेत पार पडले.
![]() |
| माजी आमदार राजेश पाटील यांनी पदविधर मतदार संघातून कोवाड येथे मतदानाचा हक्क बजावला. |
पुणे शिक्षक विधान परिषदेसाठी चंदगड, नागनवाडी, हेरे, कोवाड, तुर्केवाडी तर पदवीधरसाठी चंदगड, नागनवाडी, हेरे, कोवाड १, कोवाड २ व तुर्केवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान झाले. तहसीलदार राजेश चव्हाण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्याने मतदानाचा वेग काहीसा मंदावला. दुपारी अडीज नंतर मात्र मतदानासाठी गर्दी झाली होती.
मतदाना दरम्यान चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, चंदगड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, भाजपचे चंदगड मंडल अध्यक्ष विशाल बल्लाळ यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटू देवून माहिती घेतली.


No comments:
Post a Comment