चंदगड, दि. ३ जुलै :
चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प ९९.९२ टक्के क्षमतेने भरल्याने प्रशासनाने अतितात्काळ सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवार (४ जुलै) सकाळपर्यंत धरण १०० टक्के भरण्याची शक्यता असून, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुरुवारी (३ जुलै) सायंकाळी ६ वाजल्यापासून नदीपात्रात जलविद्युत केंद्रामार्फत ४५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन चंदगड पाटबंधारे उपविभागाने केले आहे. नदीपात्रात अथवा पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे, तसेच जनावरे नदीपात्रात नेऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश चंदगड पाटबंधारे उपविभागाचे शाखाधिकारी अजय देसाई यांनी दिले आहेत.
नदीकाठील शेतांमधील पाण्याच्या मोटारी, कृषीपंप व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्याने पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना धरण परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, नदीच्या दोन्ही तीरावरील ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करावे तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय ठेवून सर्व संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता संजय पाटील केले आहे.

No comments:
Post a Comment