'स्टॉफ इंडिया- पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेची जय्यत तयारी, ७ जून ला ३ हजार धावपटू धावणार, १४१८ स्पर्धकांनी केली ऑनलाईन नोंदणी - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2026

'स्टॉफ इंडिया- पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेची जय्यत तयारी, ७ जून ला ३ हजार धावपटू धावणार, १४१८ स्पर्धकांनी केली ऑनलाईन नोंदणी



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) 'स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवार दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता होणाऱ्या स्पर्धेनिमित्त गडावर दि. ५ ते ७ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर 'निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी 

निसर्गाचे रक्षक मोहिमेंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी, महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा. या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

    छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला व सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून धावण्याचा रोमांचकारी अनुभव देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी पर्वणी ठरली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून धाडसी मॅरेथॉन पटू उपस्थिती लावत आहेत. गतवर्षीची १२५० स्पर्धक संख्या यंदा ३ हजार पेक्षा अधिक असेल असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान २ जून पर्यंत २२१ महिला व ११९७ पुरुष अशा १४१८ स्पर्धकांनी ऑनलाईन सहभााग नोंदवला आहे.

    स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष असून स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी. ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी व ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र असून त्यांचे वयानुसार १८ गट केले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. 

   नियोजित कार्यक्रमानुसार ५ रोजी सकाळी ७ ते १० गड परिसरात ध्वजसंचलन, एनसीसी, एनएसएस व विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लॅस्टिक मुक्त अभियान, पर्यावरण जनजागृती, ६ रोजी मजरे कार्वे ग्रामस्थ नियोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळा, पारंपारिक मिरवणूक आदी कार्यक्रमांत सहभाग, दि. ७ रोजी सकाळी ६.०० वाजता मॅरेथॉन स्पर्धा उद्घाटन, ७ वाजता २१ किमी, ७.३० वाजता १० किमी व ८ वाजता ५ किमी अशा क्रमाने स्पर्धा तर १०.३० वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. तिन दिवसीय कार्यक्रमात कोअर हेरिटेज संस्थेमार्फत 'ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन' व राकेशराव धावडे यांचे मार्गदर्शन होणार आहे.

  आऊट प्ले स्पोर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी स्टॉफ इंडिया, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, माजी आ. राजेश पाटील, किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन, महाराष्ट्र वन विभाग, फिट इंडिया, महाराष्ट्र पोलीस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, एसटी महामंडळ व चंदगड पत्रकार संघाचे सहकार्य लाभले आहे.

  यावेळी स्टॉफ इंडिया चे सीईओ बिपिन चिरमुरे, आ. शिवाजीराव पाटील, राजेश पाटील, जिल्हाधिकारी, सर्व जिप. व पंस. सदस्य, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, ग्लुकोज आदी सुविधा असून सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, आकर्षक पदक, फळझाडाचे रोपटे, टी-शर्ट दिली जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून सर्व स्पर्धकांनी ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करावी. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने केले आहे.

No comments:

Post a Comment