कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बांधकाम सुरू असलेल्या घराच्या उघड्या पाण्याच्या टाकीत एकाच वेळी पडलेल्या दोन सापांना ढोलगरवाडी सर्पोद्यान चे सर्पमित्र संदीप बाबुराव टक्केकर यांनी वेळीच बाहेर काढून जीवदान दिले.
बेळगाव वेंगुर्ला रोडवरील ढोलगरवाडी फाटा नजीक बाळू रामू ओऊळकर यांच्या (हिंडलगा शाळेचे अध्यापक) घराचे बांधकाम सुरू आहे. येथील पाण्याच्या टाकीत रात्री एकाच वेळी दोन साप पडले होते. हे ओऊळकर यांच्या सकाळी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र संदीप टक्केकर यांना फोनवरून ही माहिती दिली. संदीप यांनी विना विलंब घटनास्थळी भेट देऊन अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या तस्कर जातीच्या दोन्ही बिनविषारी सापांना बाहेर काढून जीवदान दिले. सध्याचा काळ हा तस्कर सापांचा मिलन काळ असल्याने मिलन अवस्थेतील दोन्ही साप एकाच वेळी पाण्यात पडले असावे. असे यावेळी सर्पमित्र टक्केकर यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे त्यांनी उपस्थित नागरिकांना या सापांबद्दल शास्त्रीय माहिती, पर्यावरणीय महत्त्व, सावधगिरी, प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन केले. ढोलगरवाडी सर्प शाळेचे संस्थापक आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचे चिरंजीव संदीप यांनी यापूर्वी १२ ते १४ फुट लांबीच्या दोन किंग कोब्रा सह मानवी वस्तीत शिरलेल्या हजारो सापांना रेस्क्यू केले आहे. त्यांच्या कार्याचे परसरात कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment