चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान विविध पर्यटनस्थळे व विकासकामांची पाहणी करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत फाटकवाडी धरण परिसर तसेच चंदगड येथील श्री रवळनाथ मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी चंदगड तालुक्यातील पर्यटनाच्या अपार संधी, नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. फाटकवाडी धरण परिसर, हिरवाईने नटलेले डोंगररांगा, धार्मिक पर्यटन केंद्रे तसेच चंदगडच्या नैसर्गिक वारशाचा पर्यटन विकासासाठी प्रभावी वापर करण्याबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या.
राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील पर्यटनवृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्याची भूमिका स्पष्ट करत शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे तसेच पर्यटनाला चालना देणारे विविध प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
यानंतर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विकासकामे, प्रलंबित प्रकल्प, पर्यटन विकास, नागरी सुविधा व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
ईनाम सावर्डे येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता, कामांची प्रगती व अडचणी याबाबत माहिती घेण्यात आली. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासात्मक गरजा, पर्यटन विकासासाठी आवश्यक सुविधा, रस्ते, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती राज्यमंत्री मिसाळ यांना दिली. माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनीही विकासकामांच्या गतीसाठी शासनाने विशेष सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी आजरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र बांदिवडेकर, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, नामदेव पाटील, उद्योजक लक्ष्मण गावडे, चंदगड बस डेपोचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, आजरा व चंदगड नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
चंदगडच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू होणार असल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळाले असून, पर्यटनासोबतच मतदारसंघातील विविध विकासकामांनाही यामुळे अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment