चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघ दौऱ्यादरम्यान चंदगड बस डेपोला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानक परिसराची पाहणी करून प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बसस्थानकावर उपस्थित नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याशी चर्चा करताना विविध समस्या मांडल्या. अनेक मार्गांवर बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच दुर्गम व ग्रामीण भागातील काही गावांना अद्यापही पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची कामे तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.
प्रवाशांच्या समस्या ऐकल्यानंतर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्यांचा विचार करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांना सुरक्षित, वेळेवर व दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनीही मतदारसंघातील बससेवेशी संबंधित प्रश्न मांडत ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनीही प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यावेळी चंदगड बस डेपोचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या या भेटीमुळे चंदगड तालुक्यातील बससेवेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment