चंदगड / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार शिवाजीराव पाटील वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून रामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू निदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ७६ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २४ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांवर पुढील टप्प्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रामपूर येथील मराठी विद्या मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन राहुल सुभाष देवण (सरचिटणीस, भाजपा चंदगड) आणि रोहित पाटील (आमदार शिवाजीराव पाटील वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख) यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांबाबत वेळेवर उपचार मिळत नसल्याने अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
शिबिरात अनुभवी नेत्रचिकित्सक डॉ. ऋतुजा चौगुले यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. तपासणी दरम्यान मोतीबिंदू, दृष्टीदोष तसेच इतर नेत्रविकारांचे निदान करण्यात आले. मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले असून त्यांच्या वाहतूक, उपचार आणि भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तसेच वाढत्या वयानुसार डोळ्यांचे आजार वाढत असल्याने नियमित नेत्रतपासणी आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबीर मोठा दिलासा ठरले असून अनेकांनी आयोजकांचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राणबा ढेरे, रत्नहार पाटील, क्रांती गुरव, समीर चौगुले, संग्राम कांबळे, समन्वयक पंकज खानापूरे, तसेच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवीण व सौ. मनवाडकर यांनी विशेष सहकार्य केले.
आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची आवश्यकता असून, भविष्यातही ग्रामीण भागात विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि रुग्णाभिमुख सुविधा यामुळे हे शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment