चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद तसेच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडत प्रश्न विचारले असताना खासदार पाटील यांनी “मारून टाकीन” अशा शब्दांत धमकी दिली. ही घटना केवळ निषेधार्ह नसून लोकशाहीतील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर राज्यभरातील पत्रकार संघटना व विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित खासदारांनी व्हिडिओद्वारे माफी मागितली असली तरी, गंभीर स्वरूपाचा अपराध केवळ माफीने संपुष्टात येत नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांना धमक्या देणे, भयाचे वातावरण निर्माण करणे आणि दडपशाही करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा घटनांकडे दुर्लक्ष झाल्यास पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करणे, निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सावंत-भोसले, उपाध्यक्ष राहुल पाटील, सचिव चेतन शेरेगार, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील व संजय पाटील, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष संपत पाटील तसेच सदस्य ज्ञानेश्वर पाटील, एस के पाटील, मारुती पाथरवट, रोहित धुपदाळे, संदीप कांबळे ,सचिन तांदळे आदी पत्रकार उपस्थित होते.


No comments:
Post a Comment