चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2026

चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन उत्साहात साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
    भारतीय सांख्यिकी क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी दिशा देणारे थोर संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ जून रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
    महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. महालनोबीस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राचे आधुनिक काळातील महत्त्व, संशोधन, नियोजन, अर्थव्यवस्था, कृषी, उद्योग, आरोग्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याचे योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. एल. एन. गायकवाड यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना डॉ. महालनोबीस यांनी भारतीय सांख्यिकी क्षेत्राला दिलेल्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र विषयाचा अभ्यास करून संशोधन क्षेत्रातही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
    अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी संख्याशास्त्र हे आजच्या युगातील प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक विज्ञान असल्याचे सांगितले. अचूक माहितीचे विश्लेषण, योग्य नियोजन आणि प्रभावी निर्णयप्रक्रियेसाठी संख्याशास्त्राची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर डॉ. एन. एस. मासाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. राष्ट्रीय संख्याशास्त्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संख्याशास्त्र विषयाविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच संशोधनाची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment