कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
सी. पी. आर. हाॅस्पीटल तसेच इतर ब्लड बँकांमधील रक्तसाठ्याची कमतरता लक्षात घेऊन, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता करण्यात आले. शाहू जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सार्वजनिक व अधिकृत कार्यक्रमांची सुरुवात या रक्तदान शिबिराने झाली. विविध सेवाभावी संस्था, संघटना तसेच शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरासाठी १२५ हून अधिक रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून मौल्यवान योगदान दिले. विशेष म्हणजे ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या रक्तदात्यांची संख्या लक्षणीय होती. सांगली आणि बेळगाव येथील रक्तदात्यांनीही कोल्हापुरात येऊन सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी सेवा समितीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “सेवानिवृत्तीनंतरही समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे. गरजेच्या काळात असा उपक्रम राबविणे अत्यंत स्तुत्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
समितीचे राजाध्यक्ष सुबराव पवार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. जास्मिन यांनी लवकरच बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते. तसेच करवीर तालुक्याचे सहाय्यक निबंधक प्रेम रोहिदास राठोड यांनी स्वतः रक्तदान करून आदर्श निर्माण केला.
यावेळी सेवा समितीने शाहू महाराज जयंतीनिमित्त पुढील सात दिवस जिल्हाभर ‘रक्तदान शिबिर सप्ताह’ शासकीय स्तरावर साजरा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. पावसाळ्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजूंना वेळेवर मदत मिळावी, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment