चंदगड / प्रतिनिधी
शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत बागिलगे (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने विविध जातींच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
रामपूर हद्द ते तांबुळवाडी हद्द, बागिलगे गणेश मंदिर ते गावठाण हद्द, स्मशानभूमी परिसर तसेच पडिक जागांवर सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा आंबा, फणस, साग, पिंपळ, वड यांसह सुमारे २५ प्रकारची फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
'गावच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे...' या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून ग्रामस्थांसह गावातील व गावाबाहेर कार्यरत असलेल्या नोकरदारांनी आर्थिक योगदान दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ सरपंच नरसू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच परशराम सुतार व राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी पर्यावरण आणि मानवी जीवनाचा अतूट संबंध अधोरेखित करत, वृक्ष हे पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक असून हवेतील गारवा, पर्जन्यमान आणि पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य एस. आर. पाटील, जोतिबा पाटील, लक्ष्मण पाटील, कृष्णा पाटील, संभाजी पाटील, मारुती पाटील, विलास पाटील, बाबुराव वरपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपसरपंच परशराम सुतार यांनी मानले.

No comments:
Post a Comment