चंदगड / सी एल वृत्तसेवा
मुंबई व उपनगरांमध्ये अलीकडे भेसळयुक्त दूधाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असताना, नागरिकांना दर्जेदार व शुद्ध दूध उपलब्ध व्हावे आणि गोकुळ दूध संघाच्या विक्री व वितरणाचा विस्तार व्हावा या उद्देशाने आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भेट घेऊन मुंबई व उपनगरात गोकुळ दूध व दूधजन्य पदार्थांच्या वितरण केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावेळी आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांनी सांगितले की, सध्या मुंबईत शुद्ध आणि दर्जेदार दूधाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळची वितरण व्यवस्था अधिक सक्षम केल्यास मुंबई व उपनगरातील ग्राहकांना विश्वासार्ह दर्जाचे दूध आणि दूधजन्य पदार्थ सहज उपलब्ध होतील. तसेच गोकुळच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा होईल.
वितरण केंद्रांमुळे रोजगाराच्या संधी
मुंबई व उपनगरात गोकुळच्या वितरण केंद्रांना मान्यता मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना वितरक परवाने देण्यात आल्यास अनेक युवक व शेतकरी व्यवसायात उतरू शकतील. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबईतील गोकुळच्या वितरण जाळ्याचा विस्तार, ग्राहकांना शुद्ध दूधाचा पुरवठा आणि ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment