चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील सुरूते गावात शनिवारी (दि. २०) दुपारी घडलेल्या संशयास्पद घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने दोन बालिकांच्या तोंडावर स्प्रे मारल्याने त्या बेशुद्ध झाल्याचा प्रकार घडला असून त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुते येथील लक्ष्मी गल्ली येथे परशराम भाटे यांच्या घराबाहेर दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परशराम भाटे यांची मुलगी सुकन्या भाटे (वय १०), शेजारील स्वराली शिवाजी भाटे (वय ९) तसेच अन्य दोन मुली घराबाहेरील खोलीत खेळत होत्या. त्यावेळी हेल्मेट व मास्क परिधान केलेला एक अज्ञात इसम त्यांच्या घरासमोर आला.
सदर इसमाने मुलींना हाक मारल्यानंतर सुकन्या व स्वराली त्याच्याजवळ गेल्या. त्याचवेळी त्या व्यक्तीने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारल्याचे मुलींनी सांगितले. घाबरलेल्या दोन्ही मुली तत्काळ घराकडे धावत गेल्या. काही वेळातच सुकन्या बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिची दखल घेत सुकन्या व स्वराली या दोघींनाही उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णांलयात दाखल करण्यात आले.मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्तीकडे मोठी बॅगही होती. त्यामुळे मुलांना आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याबाबतचा नेमका खुलासा पोलीस तपासानंतरच होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून लहान मुलांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच यासंदर्भात चंदगड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरपंच मारुती पाटील यांनी दिली.


No comments:
Post a Comment