चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी आणि घटप्रभा या जीवनदायी नद्यांमधील पाणी कर्नाटकात वाहून जात असल्याने ते तातडीने अडविण्याची मागणी माणगाव गटाच्या मानसी भोगण यांनी केली आहे. कामेवाडी येथील बंधाऱ्यात बरगे घालून हे पाणी त्वरित अडवावे, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर टाळाठोक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
याबाबतचे निवेदन चंदगड येथील पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मयूर कुंभार यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कलाप्पा भोगण, पांडुरंग जाधव, नारायण कणुकले, जयवंत पाटील, शाखाधिकारी दिग्विजय कुंभार, कालवा निरीक्षक यशवंत मोरे तसेच एस. पी. शेवाळे उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जांबरे व जंगमहट्टी धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी ताम्रपर्णी नदीत, तर फाटकवाडी येथील घटप्रभा धरणाचे पाणी घटप्रभा नदीत प्रवाहित होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाने दोन्ही नद्यांतील सर्व बरगे काढून टाकल्याने हे पाणी चंदगड तालुक्यातून थेट कर्नाटकातील हुक्केरी तालुक्याकडे वाहून जात आहे.यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची टंचाई भासत असून अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांनाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नदीपात्रातील आवश्यक ठिकाणी तातडीने बरगे घालून पाणी अडविण्याची गरज असल्याचे मानसी भोगण यांनी निवेदनात म्हटले आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या हितासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.


No comments:
Post a Comment