ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सवासह नशामुक्तीचा संदेश, शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट : अॅड. एन. एस. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2026

ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सवासह नशामुक्तीचा संदेश, शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट : अॅड. एन. एस. पाटील

चंदगड / प्रतिनिधी

खेडूत शिक्षण मंडळ संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ या उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन अॅड. एन. एस. पाटील होते, तर नगराध्यक्ष सुनील काणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून वर्गखोल्यांपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषमय मिरवणुकीद्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी नवीनच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर  पुष्पवृष्टी करण्यात आली आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर शिक्षक संजय साबळे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच समाजातही नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याची प्रतिज्ञा घेतली.

प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिस्त, परिश्रम आणि अभ्यास यांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात अॅड. एन. एस. पाटील म्हणाले, “शिक्षण हीच खरी प्रगतीची वाट आहे. ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम म्हणजे दि न्यू इंग्लिश स्कूल होय. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत शाळेच्या नावलौकिकात भर घालावी.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, अनिल कट्टी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी मानले.

विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि नशामुक्तीचा सामाजिक संदेश यामुळे दि न्यू इंग्लिश स्कूलचा प्रवेशोत्सव प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment