हाफकिन महामंडळाचे उत्तम गायकवाड यांना राज्य शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2026

हाफकिन महामंडळाचे उत्तम गायकवाड यांना राज्य शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    हाफकिन महामंडळाच्या पिंपरी, पुणे विभागातील उत्तम लक्ष्मण गायकवाड (मुळगाव मानगड, ता. माणगाव, जि. रायगड) यांनी सामाजिक, कामगार संघटना, क्रीडा, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२५' जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण मा. राज्यपाल यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहेत. रोख रुपये २५ हजार, स्मृतिचिन्ह,  प्रशस्तीपत्र आणि सुवर्ण पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

     गायकवाड हे हाफकिन महामंडळाच्या पिंपरी पुणे विभागात तबेला क्षेत्र सहाय्यक वर्ग 'ब' या पदावर कार्यरत असून त्यांची ३६ वर्षे सेवा झाली आहे. ते पाली भाषेचे अभ्यासक असून त्यांना  यापूर्वी हाफकिन महामंडळाने 'बेस्ट सर्विस अवॉर्ड २०२१' आणि इंटक कामगार संघटनेचा हिंद रत्न कामगार पुरस्कार २०१६ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

       सर्पदंश, विंचू दंश आणि श्वान दंश प्रतिविष इंजेक्शन घोड्यांपासून तयार करण्यात येते. याकरिता हाफकिन महामंडळ अंतर्गत ९०० अश्ववर्गीय प्राणी आहेत. त्यांची निगा राखणे, काळजी घेण्याचे महत्वपूर्ण काम उत्तम गायकवाड गेली अनेक वर्षे करत आहेत. पुण्यातील 'लुई ब्रेल अंध- अपंग कल्याण संस्था', संच सामाजिक संस्था, 'पतंजली योग समिती', 'आनंदघन सामाजिक' संस्थांबरोबर ते दिव्यांग, वृद्ध, निराधार लोकांकरिता अविरत कार्य करीत आहेत. राज्य शासनाकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment