पाण्यासाठी कोवाडमधील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा; पावणे दोन कोटींची जलजीवन मिशन योजना अद्याप अधांतरी - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2026

पाण्यासाठी कोवाडमधील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा; पावणे दोन कोटींची जलजीवन मिशन योजना अद्याप अधांतरी

 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केल्याने लक्ष्मीनगर परिसरातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.

    सरिता सदानंद पाटील, शाहीन अझहर मुल्ला, सुजाता बोरगावकर, यास्मिन अब्दुल खानापुरे ,सिमरन शब्बीर मुल्ला यांच्यासह अनेक महिलांनी मोर्चात सहभाग घेतला. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने कार्यालयात कोणतेही पदाधिकारी अथवा प्रशासकीय प्रमुख उपस्थित नसल्यामुळे महिलांनी कर्मचाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द करून आंदोलन स्थगित केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेतही गावातील अनेक भागात होत असलेल्या अशुद्ध ,अनियमित पाणीपुरवठा आणि विकासकामांवरील खर्च हे प्रमुख चर्चेचे विषय ठरले होते. या मुद्द्यांवरून ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाले.

ताम्रपर्णी नदीच्या काठी वसलेल्या कोवाड गावाला नदीचे वरदान लाभले असले तरी नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या गावात सुमारे वीस वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा व्यवस्था कार्यरत असून जॅकवेल, मोटार आणि पाईपलाईनमधील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जाते.

ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ७३ लाख ९७ हजार २१५ रुपयांच्या नळपाणी पुरवठा सुधारणा योजनेला १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. नियमानुसार ही योजना २९ जून २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजतागायत योजना पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, पाण्याच्या टाकीच्या बांधकामात गंभीर त्रुटी असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही काही चुकीच्या बाबी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.

तसेच बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आणि काही ठिकाणी काँक्रीटमध्ये मोठ्या दगडांचा वापर झाल्याचे पुरावे नागरिकांनी समोर आणले आहेत. त्यामुळे या योजनेचे भवितव्य सध्या अधांतरी असल्याचे चित्र दिसत आहे.


ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :

पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी.

दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई.

निकृष्ट दर्जाची टाकी पाडून नव्याने सुरक्षित टाकी उभारणे.

जलजीवन मिशनची योजना तातडीने पूर्ण करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करणे.

पाणी हा मूलभूत हक्क असताना नदीकाठी वसलेल्या कोवाड गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


No comments:

Post a Comment