चंदगड / प्रतिनिधी
"प्रमाण भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात झाला पाहिजे. भाषा ही संस्कृतीची वाहक असून संस्कृती जपण्यासाठी भाषेचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन आणि वाचनाच्या सवयीमुळे भाषा चळवळीला बळ मिळते," असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सौ. दिपा बल्लाळ यांनी केले.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात ९५ पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा व शिक्षकांचा गौरव सोहळा राजगोळी हायस्कूल, राजगोळी येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते. प्रास्ताविक रविंद्र पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय एम. एन. शिवणगेकर यांनी करून दिला. यावेळी मराठी विषयात ९५ पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा व शिक्षकांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्रीराम विद्यालय, कोवाड येथील विद्यार्थीनी कु. शर्वरी पाटील तसेच जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल कु. जान्हवी मोहनगेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आर्या साबळे व शर्वरी पाटील यांनी मनोगत व्यक्त करून मराठी भाषेप्रती असलेली आपली जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली.
प्रमुख वक्ते राघवेंद्र इनामदार म्हणाले, "आपल्या कर्तृत्वामुळे पालकांचा सन्मान वाढेल असे कार्य विद्यार्थ्यांनी केले पाहिजे." तर पांडुरंग मोहनगेकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना, "आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका," असा मौलिक संदेश दिला.
या कार्यक्रमास मनगुतकर, कमलेश कर्णिक, एस. पी. पाटील, व्ही. एल. सुतार, बाबासाहेब मुल्ला, संदीप चिंचणगी, अशोक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी केले, तर बी. एन. पाटील यांनी आभार मानले.

.jpeg)
No comments:
Post a Comment