अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी आठ जणांना अटक; एसआयटी तपास सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2026

अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी आठ जणांना अटक; एसआयटी तपास सुरू

 


नवी दिल्ली : विशेष वृत्तसेवा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात भक्तांकडून प्राप्त झालेल्या देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्राथमिक अहवालानंतर मंदिर न्यासाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रामाशंकर उर्फ टिनू यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश (किंवा कमलेश) पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रामाशंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव यांचा समावेश आहे. तपासात देणगी मोजणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली होती. प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर झाल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी निष्पक्ष चौकशीसाठी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची माहिती न्यासाने दिली असून, सर्व देणग्या सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

No comments:

Post a Comment