चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी; शेतकऱ्यांची पेरणीला लगबग - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2026

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी; शेतकऱ्यांची पेरणीला लगबग

 

चंदगड / प्रतिनिधी : 

    चंदगड तालुक्यात शनिवारी दिवसभर ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कधी रिमझिम पाऊस तर कधी उघडीप असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळाले. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणाऱ्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

    गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला. पावसाचा योग्य फायदा घेत अनेक शेतकऱ्यांनी शेतात उतरून खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग दिला. बैलजोड्या, ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्रांच्या सहाय्याने शिवारात सर्वत्र लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    भात, नाचणी तसेच अन्य खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सकाळपासूनच शेतात दाखल झाले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील शिवार गजबजून गेले होते. हलक्या सरींमुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

    दरम्यान, आगामी काही दिवस नियमित स्वरूपाचा पाऊस झाल्यास उर्वरित पेरण्यांनाही वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment