चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री ते कागणी मार्गावरील कालकुंद्री गावालगत असलेल्या ओढ्यावरील मोरीचा भराव खचल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी मोरीच्या दुतर्फा भराव वाढवण्याबरोबरच किमान ३० मीटर लांबीच्या धक्का भिंती बांधाव्यात अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यातील अतिवृष्टी वेळी जुन्या मोरी वरून अनेक वेळा पाणी वाहत असायचे तसेच ताम्रपर्णी नदीच्या पुराचे पाणी मोरीवर येऊन वाहतूक अनेक दिवस खंडित होत होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने सात वर्षांपूर्वी सन २०१८-१९ मध्ये या ओढ्यावरील मोरीची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले होते. बांधकाम सुरू असताना रस्त्याची उंची पाहता दोन्ही बाजूला किमान ३० मिटर लांबीच्या धक्का भिंती बांधाव्यात अशी मागणी झाली होती. तथापि त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाने काम पूर्ण केले.
रस्त्याची उंची वाढल्याने भराव टाकून त्यावरच डांबरीकरण करण्यात आले. तथापि गेल्या पाच सहा वर्षात पाऊस व विविध कारणांनी भराव खचून रस्त्याची रुंदी डांबरीकरणापर्यंत म्हणजे केवळ दहा-बारा फूट राहिली आहे. या ठिकाणी एका वेळी समोरासमोर दोन वाहने आल्यास बाजू काढताना वाहने रस्त्याच्या खाली पडून जीवित व मालमत्तेची हानी होऊ शकते. रात्रीच्या वेळी तर हे ठिकाण मृत्यूचा सापळाच बनले आहे. त्यामुळे या ठिकाणाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने धक्का भिंती बांधण्याचे काम हाती घ्यावे व तात्पुरती उपाय योजना करावी. अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:
Post a Comment