ऊस रोपवाटिकेतून दर्जेदार ऊस रोपांचा पुरवठा वाढविण्यावर भर - सुधीर पाटील, ऊस रोपवाटिका धारकांसोबत संवाद कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2026

ऊस रोपवाटिकेतून दर्जेदार ऊस रोपांचा पुरवठा वाढविण्यावर भर - सुधीर पाटील, ऊस रोपवाटिका धारकांसोबत संवाद कार्यक्रम

कोवाड /  प्रतिनिधी : 

ओलम शुगरतर्फे यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना दोन कोटी दर्जेदार ऊस रोपांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ऊस रोपवाटिकांमधून गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती केन हेड तथा मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

हेमरस कारखान्याच्या कार्यस्थळी ओलम शुगरशी करार केलेल्या विविध ऊस रोपवाटिका धारकांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या बैठकीस परिसरातील १५ ऊस रोपवाटिका मालक उपस्थित होते.

सुधीर पाटील यांनी सांगितले की, मागील गाळप हंगामात ओलम शुगरने अनुदान तत्त्वावर विविध रोपवाटिकांच्या माध्यमातून एक कोटी दर्जेदार ऊस रोपांचा पुरवठा केला होता. यंदा हे लक्ष्य दुप्पट करून दोन कोटी रोपे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

युनिट हेड राधाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरीहिताच्या विविध व्यापक योजना राबविण्यात येणार असून, त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी रोपवाटिकेतील रोपांचा वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता जवळपास १०० टक्के असल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होते. तसेच पाण्याची उपलब्धता आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य रोपांची निवड करता येत असल्याने फुटवा चांगला येऊन उत्पादनात वाढ होते.

आगामी हंगामासाठी को-८६०३२, एमएस-१०००१, को-९२००५, को-व्हीएसआय-३१०२ आणि फुले ऊस-१३००७ या पाच ऊस जातींची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्याबाबत रोपवाटिका धारकांशी चर्चा करण्यात आली. कारखान्याच्या सर्व शेती कार्यालयांमार्फत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही रोपे वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला चंदगड झोन आणि गडहिंग्लज झोन उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment