ऊस वाहतुकीतील अपघात रोखण्यासाठी चंदगड पोलिसांची मोहीम, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा; कारखान्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2026

ऊस वाहतुकीतील अपघात रोखण्यासाठी चंदगड पोलिसांची मोहीम, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा; कारखान्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

 


चंदगड : सी एल वृतसेवा

ऊस वाहतुकीच्या हंगामात ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकच्या अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी चंदगड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर बसविणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ऊस वाहतुकीदरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकचा अंदाज न आल्याने अनेकदा गंभीर अपघात घडतात. यामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेत चंदगड पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.

पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना आवश्यक रिफ्लेक्टर बसविणे, वाहनांची सुरक्षितता तपासणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनामुळे अपघात घडल्यास संबंधित वाहनचालकासह परिस्थिती व पुराव्यांच्या आधारे संबंधित साखर कारखान्याच्या जबाबदार शेती अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केवळ नोटिसा बजावण्यापुरती मोहीम मर्यादित न ठेवता चंदगड वाहतूक पोलीस पथकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तपासणी सुरू केली आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर जागेवरच रिफ्लेक्टर बसविण्याची कार्यवाही केली जात असून, वाहनचालक आणि मालकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

दरम्यान, ऊस वाहतूक करणाऱ्या तसेच अन्य वाहनांवर मोठ्या क्षमतेच्या साउंड सिस्टीम, टेंपर रेकॉर्डर लावून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजविणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे. अशा प्रकारांमुळे ध्वनिप्रदूषण होण्याबरोबरच वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा वाहनांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

'अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच तो रोखणे हे आमचे प्राधान्य आहे. वाहनांवर रिफ्लेक्टर असणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,' असा स्पष्ट इशारा चंदगड पोलिसांनी दिला आहे.

या मोहिमेत ऊस वाहतूकदार, साखर कारखाने, वाहनमालक आणि चालक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन चंदगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment