हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ३६ एकर जागा खरेदीस शासनाची मंजुरी - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2026

हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ३६ एकर जागा खरेदीस शासनाची मंजुरी

  

चंदगड / प्रतिनिधी : 

    चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि युवकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाला चंदगड येथील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये उपविभागीय कार्यालय, सेंटर ऑफ एक्सलन्स युनिट, काजूसाठी विशेष वस्तू बाजार (Special Commodity Market), काजू प्रक्रिया प्रकल्प, गोदाम तसेच अन्य आवश्यक सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या १,४७,६२० चौरस मीटर (सुमारे ३६ एकर) भूखंडाची खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
    या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला मोठी चालना मिळणार असून काजू उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक प्रक्रिया, साठवणूक, विपणन आणि निर्यात यासाठी सक्षम सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन काजू प्रक्रिया उद्योगाला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    दरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मोलाचे सहकार्य करणारे महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री जयकुमारजी रावल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्त चंदगडवासीयांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शेतकरी आणि काजू उद्योगाच्या प्रगतीसाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment