आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिमेचे आग्रा येथून थेट प्रक्षेपण होणार...! चंदगड व सीमाभागातील पत्रकार ऐतिहासिक गडांवरुन जल घेऊन जाणार - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2026

आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिमेचे आग्रा येथून थेट प्रक्षेपण होणार...! चंदगड व सीमाभागातील पत्रकार ऐतिहासिक गडांवरुन जल घेऊन जाणार

 


बेळगाव : सी एल वृत्तसेवा 

  आग्रा ते राजगड दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक 'गरुड झेप मोहिम' च्या ७ व्या पर्वाचे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल बादशहा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन त्याच्या नजर कैदेतून सुटका करून घेतलेल्या दिवसाच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित 'शिवचातुर्य दिन' कार्यक्रमाचे थेट (live) प्रक्षेपण चंदगड तालुका (जि. कोल्हापूर) आणि बेळगाव सीमाभागातील पत्रकार करणार आहेत. हे थेट प्रक्षेपण चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज' चैनल वर दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७ ऑगस्ट १६६६ रोजी आपली सुटका करून घेतली होती. महाराष्ट्रासह जागतिक इतिहासात या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  शिवचातुर्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ले पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड, महिपाळगड (ता. चंदगड), सामानगड (ता. गडहिंग्लज) व राजहंसगड (ता. बेळगाव) या सहा प्रमुख किल्ल्यांवरील पवित्र जल या मोहिमेसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

  या मोहिमेत सीमाभागातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री), संपत रामाना पाटील (नांदवडे), चेतन वेंकटेश शेरेगार (चंदगड), दीपक गावडे (न्हावेली) आदी पत्रकार व शिवभक्तांचा सहभाग असणार आहे. हे सर्व पत्रकार १३ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगाव येथून गोवा एक्सप्रेसने आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याकडे रवाना होणार आहेत. तेथील कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ऐतिहासिक किल्ल्यांच्या जलाने अभिषेक करण्यात येणार आहे. हे यंदाच्या मोहिमेचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.

 *थेट प्रक्षेपणासाठी अनुमती* 

  मोहिमेचे संपूर्ण आणि अद्ययावत थेट (Live) प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघाने गरुड झेप मोहीम समितीचे अध्यक्ष स्वराज्याचे सरसेनापती व छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले पिलाजी गोळे यांचे थेट तेरावे वंशज ॲड. मारुती उर्फ आबा गोळे (पुणे) यांच्याकडे अधिकृतपणे प्रक्षेपणाची अनुमती मागितली. त्याला गरुड झेप संस्थेच्या वतीने ॲड गोळे यांनी हिरवा कंदील दाखवत पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सहर्ष कौतुक केले. या प्रक्षेपणामुळे मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास घराघरांत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे ॲड. गोळे यांनी म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या नियोजनासाठी आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी या सर्व पत्रकारांचा समावेश मोहिमेच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. 

  यंदाच्या मोहिमेत चंदगड व सीमा भागातील पत्रकार, चंदगड, गोवा, कोल्हापूर, बेळगाव ल पुणे येथून मोठ्या संख्येने शिवभक्त आग्रा येथे दाखल होणार आहेत. एकंदरीत यंदाची आग्रा ते राजगड मोहीम व आग्रा किल्ल्यावरील 'शिवचातुर्य दिन सोहळा' शिवप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्की...!

No comments:

Post a Comment