चंदगड : प्रतिनिधी
कृषी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भात, भुईमूग आणि नाचणी उत्पादन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विविध स्तरांवरील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी नरेंद्र कुंभारे व संजय राठोड तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय नाचणी उत्पादन स्पर्धेत कोनेवाडी येथील नारायण राम कडूकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर करंजगाव येथील धोंडीबा ओमाना शिट्याळकर यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय नाचणी उत्पादन स्पर्धेत गणूचीवाडी येथील विमल दत्तू भादवणकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर करंजगाव येथील देवाप्पा जकोबा गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तालुकास्तरीय नाचणी उत्पादन स्पर्धेत शेवाळे येथील सुरेश रामू फडके प्रथम, हल्लारवाडी येथील मुकुंद महादेव सदावर द्वितीय आणि शेवाळे येथील नारायण लक्ष्मण पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
तालुकास्तरीय भुईमूग उत्पादन स्पर्धेत राजगोळी बुद्रुक येथील विठ्ठल सत्तूप्पा तोंडले यांनी प्रथम, तर विठ्ठल शिवाजी शिंदे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
तालुकास्तरीय भात उत्पादन स्पर्धेत तेऊरवाडी येथील भागोजी तुकाराम पाटील प्रथम आले. मुगळी येथील अर्जुन कृष्णा मळेकर यांनी द्वितीय, तर मुरकुटेवाडी येथील तुकाराम निंगो मुरकुटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होत असून, कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment