कोवाड / सी. एल वृत्तसेवा
ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या वतीने महिला शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), मांजरी (पुणे) येथे १४ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय निवासी 'ज्ञानलक्ष्मी' महिला प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कारखान्यातील ४१ महिला शेतकऱ्यांना मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्चही कारखान्याकडून उचलण्यात आला आहे.
प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले की, ऊस लागवड, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आदी प्रत्येक टप्प्यावर महिलांचा मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे आधुनिक व शास्त्रोक्त ऊस लागवड तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची क्षमता महिलांमध्ये अधिक असल्याने त्याचा निश्चितच ऊस उत्पादनवाढीस व कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
VSI येथे प्रशिक्षणादरम्यान शुद्ध बेणे निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, किड व रोग व्यवस्थापन तसेच आधुनिक ऊस शेतीतील विविध तांत्रिक बाबींवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिला शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, तसेच मिळालेले ज्ञान इतर महिला शेतकरी भगिनींपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भविष्यात समूह शेती व गट शेतीसारख्या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षित महिला शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करत प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर सर्व सहभागी महिला शेतकऱ्यांचा कारखाना कार्यस्थळी विशेष मेळावा आयोजित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ऊस विकास अधिकारी रणजीत सरदेसाई, नामदेव पाटील, सर्व केन ऑफिसर, फील्ड ऑफिसर तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment