| तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा : |
सोळाव्या वित्त आयोगाचा विकास आराखडा तयार करताना बंधित निधीच्या चार प्रकारांमध्ये उपलब्ध निधीनुसार डस्टबीन, सेग्रिगेशन शेड व अन्य मालमत्तांसाठी निधीची तरतूद करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ डस्टबीन उपलब्ध करून दिल्याने गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार नाही. कचरा नियमितपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला घंटागाडी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच परिषद चंदगडचे उपाध्यक्ष सी. ए. पाटील यांनी केली.
गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी डस्टबीन देणे ही चांगली बाब आहे. मात्र, त्यानंतर निर्माण होणारा कचरा नियमितपणे कोण जमा करणार आणि तो कुठे नेऊन त्याची विल्हेवाट लावणार, याबाबत कायमस्वरूपी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. त्यामुळे विकास आराखडा तयार करताना केवळ डस्टबीन खरेदी करण्याऐवजी कचरा संकलनाची प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, असे पाटील यांनी सांगितले.
“गावात दोन वर्षांपासून दोन-दोन डस्टबीन देण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी त्यांचा वापर कचरा टाकण्यासाठी होण्याऐवजी कडधान्ये व इतर वस्तू साठवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे डस्टबीन देण्यामागचा मूळ हेतूच साध्य होत नाही,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक घरातून नियमितपणे कचरा संकलित करून त्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी घंटागाडी आवश्यक आहे. घंटागाडी उपलब्ध झाल्यास नागरिकांमध्येही घरातील कचरा घंटागाडीत देण्याची सवय निर्माण होईल. परिणामी गावातील रस्ते, गटारे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे कचऱ्याचे ढीग कमी होऊन स्वच्छता राखण्यास मदत होईल.
चंदगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती लहान असून त्यांचे स्वनिधीचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यामुळे केवळ ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक साधने उपलब्ध करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरते. वित्त आयोगातूनही लहान ग्रामपंचायतींना मर्यादित निधी उपलब्ध होत असल्याने या समस्येकडे वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान ५० टक्के निधी कचरा संकलनासाठी घंटागाडी व संबंधित यंत्रणा उभारण्यासाठी वापरावा. डस्टबीन देण्याबरोबरच कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था निर्माण झाली, तरच गावातील स्वच्छता अभियानाचा खरा उद्देश साध्य होईल. त्यामुळे विकास आराखडा तयार करताना कचरा व्यवस्थापनाचा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस तरतूद करावी, अशी अपेक्षा सी. ए. पाटील यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment