कालकुंद्री येथे ओलम कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रॅक्टर ग्रामस्थांनी अडवला. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम- हेमरस कारखान्याकडे कालकुंद्री मार्गे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ग्रामस्थांनी सायंकाळी ४ वाजता अडवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गत हंगामातील ४०० रुपये तर चालू गळीत हंगामात उसाला प्रति टन किमान ३४०० रुपये दर कारखानदारांनी जाहीर करावा यासाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. याचा निर्णय लागण्यापूर्वीच तुर्केवाडी परिसरातून हा ट्रॅक्टर ऊस भरून कारखान्याकडे चालला होता. तो संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी कालकुंद्री गावाशेजारी अडवला. काही वेळातच आंदोलनाच्या ठिकाणी मोठा जमाव गोळा झाला. कारखान्याचे कर्मचारी व चंदगड पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला. यावेळी त्यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न झाला तथापि संतप्त ग्रामस्थांनी याला दाद दिली नाही, उलट हेमरससह तालुक्यातील साखर कारखाने काटा मारी करतात असा स्पष्ट आरोप करत शेतकरी संघटनेने तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक वजन काटा उभा करून काटा मारीच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली.
रात्री कालकुंद्री एसटी स्टँड चौकात झालेली आंदोलकांची गर्दी. |
सायंकाळी सात नंतर चंदगडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलिसांच्या अधिक कुमकेसह घटना स्थळी दाखल झाले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा दीपक पाटील हे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले. कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांनी आंदोलक ग्रामस्थांची समजूत करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही यश आले नाही उलट अशा स्फोटक परिस्थितीत ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्याचा निषेध करण्यात आला. सायंकाळी सात नंतर पुन्हा प्रचंड मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला. एसटी स्टँड चौकातील जमावाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आंदोलकांनी ट्रॅक्टर कारखान्याकडे न सोडता माघारी पाठवण्याचा पवित्रा घेतल्याने सर्वांनुमते उसाने भरलेला ट्रॅक्टर पोलीस बंदोबस्तात आल्या पावली परत पाठवण्यात आला.
ऐन दिवाळीत कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवण्याची मनीषा बाळगलेल्या पोलिसांचा ताण या घटनेमुळे चांगलाच वाढला. तथापि कोणताही अनुचित प्रकार न घडता ट्रॅक्टरला माघारी पाठवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
No comments:
Post a Comment