कोवाड येथील जुन्या बंधाऱ्यावर दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता असलेली पाण्याची पातळी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
आज सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोवाड येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला. केवळ एका तासात एक फूट पाणी वाढल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गात महापुराच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील झांबरे- उमगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहत आहेत. परिणामी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तालुक्यातील महत्त्वाचे गवसे- इब्राहिमपूर, चंदगड- हेरे व माणगाव नजीकचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत. त्यात आता कोवाड बंधाऱ्याची भर पडली आहे. तर दाटे नजीक बेळगाव- वेंगुर्ला राज्यमार्गावर ताम्रपर्णी नदीचे पाणी येण्याची शक्यता वाढली आहे.
कृष्णा खोरे योजनेतील चंदगड मधील २३ लघुपाटबंधारे प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने महापुराची शक्यता कमी असली तरी पावसाची संततधार अशीच राहिली तर हे प्रकल्प पूर्ण भरण्यास जास्त दिवस लागणार नाहीत. हे सर्व बंधारे भरल्यानंतर पावसाचा जोर असाच राहिल्यास महापुराचे सावट घोंगावणार आहे. सन २०१९ मध्ये अचानक आलेल्या विध्वंसकारी महापुराच्या आठवणी कोवाड सह नदीकाठच्या गावातील लोकांना सतावत असल्याने नदीकाठी राहणारे नागरिक व्यापारी व शेतकरी सतर्क झाले आहेत.
दरम्यान २०१९ पासून प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीसच नदीकाठी राहणारे नागरिक, व्यापारी यांना बजावण्यात येणाऱ्या सावधगिरी व इशारा नोटीसा यंदा बजावल्या नसल्याचे समजते.
No comments:
Post a Comment