दुंडगे नजीक लोखंडी अँगल उभे करून मार्ग अडवला आहे, या ठिकाणी थांबलेले पोलीस पाटील व कोतवाल. |
कालकुंद्री : सी. एल. वृतसेवा
बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झाल्याने कुदनूर ते दुंडगे (ता चंदगड) दरम्यानच्या बंधाऱ्यावरून चालणारी सर्व प्रकारची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून १ जुलै २०२४ पासून बंद करण्यात आली होती. तथापि बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस झाडांच्या फांद्या टाकून केलेले अडथळे दुसऱ्याच दिवशी नदीत फेकून वाहतूक पुन्हा राजरोसपणे सुरू होती. याचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून आदेशाची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.
धोकादायकरित्या सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त झळकताच कुदनूर व दुंडगे ग्रामपंचायतींना वरिष्ठ कार्यालयाकडून आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या नंतर काल दि. ३ रोजी दुपारनंतर बंधाऱ्याच्या दुंडगेकडील बाजूस लोखंडी अँगल वेल्डिंग करून तर कुदनूर कडील बाजूस ट्रॅक्टर ट्रॉली आडवी लावून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी इशारा फलकाद्वारे वाहतूक कामेवाडी, चिंचणे मार्गे वळवण्यात आल्याचे सुचित केले आहे.
एकीकडे हे काम पाटबंधारे विभागाचे असताना ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरल्याच्या ग्रामपंचायत वर्तूळातून नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे कुदनूर व दुंडगे गावां दरम्यान बँका, पतसंस्था, आठवडी बाजार व नियमित बाजारासाठी येजा करणारे ग्राहक, प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत येणारे विद्यार्थी, दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना अर्धा किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. परिणामी बंदी या देशाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आदेशाचा फेरी विचार करून वाहतूक १०० टक्के बंद करण्याऐवजी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस जमिनीमध्ये उभे लोखंडी किंवा सिमेंट पोल उभे करावेत, जेणेकरून दुचाकी व पायी जाणाऱ्या ग्रामस्थांना अडथळा होणार नाही. पण चार चाकी व मोठी वाहने जाणार नाहीत. अशा प्रकारचे नियोजन करावे अशी मागणी दोन्ही गावांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान काल पासून कुदनूर चे पोलीस पाटील नामदेव लोहार व कोतवाल रूपाली हवालदार तर दुंडगे चे कोतवाल मारुती पाटील व काही ग्रामपंचायत सदस्य प्रवासी व वाहनधारकांना पुलावरून जाऊ नका अशा सूचना देत थांबले होते.
दरम्यान दुंडगे मार्गे वाहतूक बंद झाल्यामुळे कुदनूर, कालकुंद्री, कागणी रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.
कुदनूर बाजूस ट्रॅक्टर ट्रॉली आडवी लावून बंधाऱ्याकडे जाण्याचा मार्ग अडवला आहे.
No comments:
Post a Comment