कालकुंद्री येथे रात्री तीन गाई चोरट्यांनी पळवल्या, घटनेने शेतकरी वर्गात खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2026

कालकुंद्री येथे रात्री तीन गाई चोरट्यांनी पळवल्या, घटनेने शेतकरी वर्गात खळबळ

काही महिन्यापूर्वी तुकाराम पाटील याच गायींना चारत असताना त्यांच्या मुलग्याने सहज म्हणून काढलेला फोटो

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथे काल रविवार दि. २५/०१/२०२६ रात्री २ गायी व पाडी अशी तीन जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेमुळे कालकुंद्री परिसरासह तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची कोवाड पोलिसात नोंद झाली आहे. 

ज्या गोठ्यातून गाई चोरून नेल्या तो गोठा पाहणी करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ

   याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कालकुंद्री येथील शेतकरी तुकाराम सुबराव पाटील यांनी गावच्या हद्दीत बेळगाव पानंद मार्गावरील बाग नावाच्या शेतात तात्पुरता गोठा बांधला आहे. रविवारी सायंकाळी दूध काढल्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांनी गाईंना चारा पाणी देऊन ते गावातील आपल्या घरी मुक्काम साठी आले होते. सकाळी दूध काढण्यासाठी पुन्हा मोठ्याकडे गेले असता त्यांना दोन्ही गाई व तीन वर्षांची पाडी अशी तिन्ही जनावरे गोठ्यात दिसून आली नाहीत. यामुळे त्यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळले. सध्याच्या बाजार भाव भावा नुसार या तिन्ही जनावरांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये होते. 

चिखलात जनावरांच्या पायाचे उमटलेले ठसे पोलीस कर्मचाऱ्यांना दाखवताना तुकाराम पाटील व त्यांचे कुटुंबीय

   मागील वर्षी याच दिवसात (६ फेब्रुवारी २०२५) तुकाराम पाटील यांच्या गावातील घराला आग लागून संपूर्ण घर, घरातील सोन्या चांदीचे दागिने व तीन लाख रुपये रोख रक्कम असे सर्व भस्मसात झाले होते. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आगीच्या घटनेनंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपल्या शेतात झोपडी वजा गोठा बांधला होता. निर्मनुष्य अशा परिसरातील या गोठ्यातील तिन्ही जनावरे अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून लांबवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

  सकाळी घटनेची माहिती समजताच गावच्या सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, पोलीस पाटील संगीता कोळी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, विठ्ठल पाटील, प्रशांत मुतकेकर, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली देऊन पाहणी केली. गोठ्यापासून पूर्वेकडील किटवाड गावाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरील चिखलात जनावरांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसले.

No comments:

Post a Comment